सांगली जिल्ह्याची लक्षवेधी वाटचाल

माणदेशी माणसांची भूमी :

व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यातील माणदेशी माणसांची ही भूमी

सांगली ते नरसोबाची वाडी हे अंतर पुरात पोहत जाणारी इथली माणसं

आरेवाडी, ढाळगाव ही चैतन्यपूर्ण गजनृत्याची भूमी.

पुरातल्या होड्यांच्या शर्यती हे इथल्या लोकसंस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य.


स्वातंत्र्यलढ्यातील जिल्ह्याचे योगदान :

१९४२ च्या आंदोलनाने एकसंघ सातारा जिल्हा ढवळून निघाला.

भूमिगत चळवळीने जिल्ह्यात रौद्र रूप धारण केले.

भूमिगत क्रांतिकारकांच्या पत्री सरकारने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.

‘समांतर सरकार व्यवस्था’ हे प्रतिसरकारचे महत्वाचे वैशिष्ट्य होते.

‘प्रती सरकार’ या चळवळीला जनसामान्यांचा मनपूर्वक पाठींबा होता.


क्रांतीकारकांची सशक्त फळी :

जिल्ह्याच्या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व करणारी फळी जिल्ह्यात होती.

कुंडलचे जी.डी.बापू लाड, वाळव्याचे नागनाथअण्णा नायकवडी, येडेनिपाणीचे पांडू मास्तर, येडेमच्छिंद्रचे क्रांतीसिंह नाना पाटील, वाटेगावचे बर्डे गुरुजी यांच्यासह बाबुराव चरणकर, धोंडीराम माळी, नाथाजी लाड , गौरीहर सिंहासने, बाबूजी पाटणकर, जोशीकाका असे अनेक क्रांतीकारक ब्रिटिशांविरोधातील कारवायात अग्रेसर होते.


पलायन आणि पैलतीर :

क्रांतीकार्यात सहभागी झाल्यामुळे पदमाळेचे तरुण वसंतदादा पाटील यांना इंग्रजांनी अटक करून सांगलीच्या तुरुंगात ठेवले होते. तिथे दादांनी तुरुंग फोडून पलायनाचा कट रचला. २४ जुलै १९४३ च्या दुपारी दादांनी तिथल्या सहकारयांच्या मदतीने तुरुंग फोडून पलायन केले. तेव्हा अण्णा पत्रावळे यांच्या समवेत होते. इंग्रज पाठलाग करत गोळीबार करत होते. या गोळीबारात अण्णा पत्रावळे शहीद झाले. दादांनाही गोळी चाटून गेली, पण जीवावर उदार होऊन त्यांनी कृष्णा वारणेच्या पुरातून पोहत जाऊन पैलतीर गाठला. त्यांनी स्वातंत्रोत्तर काळात महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले.


‘नाट्यपंढरी’ सांगली :

आधुनिक मराठी रंगभूमीवरील ‘सीता स्वयंवर’ या विष्णूदास भावे रचित नाटकाचा पहिला प्रयोग ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगलीत झाला.

त्यामुळे सांगलीस नाट्यपंढरी म्हणून ओळखले जाते व ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी मराठी नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ देऊन सन्मान करण्यात येतो.


स्वतंत्रपूर :

जगातील पहिली ‘कैद्यांची मुक्त वसाहत’ औंधच्या पंतप्रतिनिधींनी आटपाडीजवळ ‘स्वतंत्रपूर येथे १९३९ साली स्थापना केली.

कैद्यांवर मानवतेचे संस्कार घडवणे या उदात्त हेतूने या वसाहतीची निर्मिती करण्यात आली.

उदात्त हेतूने सुरु झालेला हा प्रयोग आजही सुरु आहे.


किर्लोस्करवाडी :

१९१० साली कुंडल – पलूस परिसरात ‘किर्लोस्करवाडी’ ही देशातील पहिली औद्योगिक वसाहत लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी वसवली.

लोखंडी नांगरातून सुरु झालेली लक्ष्मणरावांची औद्योगिक वाटचाल आज जागतिक स्तरावर पोचली आहे.

उद्योगांबरोबरच साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे समाजमन विकसित करण्याचे कार्य ‘किर्लोस्कर’ मासिकाने केले आहे.


मुद्रण संस्कृतीचे माहेरघर :

मिरजेच्या पटवर्धन सरकारांकडील कारागिरांनी नागरी भाषेतील पहिले ठसे तयार केले.

या ठशांच्या सहाय्याने १८०५ साली ‘भगवतगीता’ हा ग्रंथ पहिल्यांदा छापला गेला.


द्राक्षकुल तासगाव :

स्वातंत्र्योत्तर काळात ‘प्रयोग परिवार’ ही संकल्पना शेतीतज्ञ प्र. शं. ठाकूर, श्रीपाद दाभोळकर, वसंतराव आर्वेअण्णा यांनी शेतीत राबवण्यास सुरवात केली.

द्राक्षबागा डोलू लागल्या व द्राक्षांचे क्षेत्र वाढू लागले.

उत्पादनासोबत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तासगावची द्राक्षे जगाच्या कानाकोपरयात पोचली.

या द्राक्षक्रांतीने सांगली जिल्हा महाराष्ट्रातील आघाडीच्या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यात समाविष्ट झाला.

‘तास-ए-गणेश’ ही द्राक्षाची जात म्हणजे तासगावच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची देणगी आहे.


ग्रामीण साहित्य संमेलने :

औदुंबर येथे कवी सुधांशु आणि कथाकार म. बा. भोसले यांनी पहिले ग्रामीण साहित्य संमेलने भरवले.

महामहोपाध्याय द. वा. पोतदार हे या संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते.

तेव्हांपासून कुठलीही निवडणूक वा राजकारणाशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.


मिरज आणि सांगली :

शिलाहार राजवटीचा भाग असलेल्या मिरज शहराचा उल्लेख ‘मिरींच’ अथवा ‘मिरजय’ असा सापडतो.

मिरज हे आदिलशाहीचे प्रवेशद्वार होते. पुढे हे पटवर्धनांची राजधानी बनले.

सांगली या नावाची उत्पत्ती ‘संगळगी’ किंवा सहा गल्ल्यांच गाव यावरून सांगली हे नांव पडले असावे, असे सांगितले जाते.

मिरज जहागीरीतून बाहेर पडलेल्या थोरल्या चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली हे वेगळे राज्य बनवले. तेव्हापासून मिरज व सांगली ही दोन स्वतंत्र संस्थाने झाली.

मिरज व सांगलीसह सध्या या शहरांसाठी ‘सांगली-मिरज-कुपवाड’ ही महानगरपालिका कार्यरत आहे.


मिरज गायकांची कर्मभूमी :

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. विष्णू दिगंबर पटवर्धन, निळकंठबुवा जंगम या महान गायकांची मिरज ही कर्मभूमी होती.

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे प्रमुख कार्यालय मिरज येथे आहे.

किराणा घराण्याचे आद्य संस्थापक अब्दुल करीम खाँ यांचे मिरजेत ४० वर्षे वास्तव्य होते.

मिरज हे सतार, तंबोरा इत्यादी तंतुवाद्यांच्या निर्मितीचे केंद्र आहे.

मिरजेतील सतारमेकर गल्ली ही तंतुवाद्यांनी भरून गेलेली असते.


मिरज महाराष्ट्राची आरोग्यानगरी :

गंगाधरपंत पटवर्धन यांच्यामुळे मिरजेत पाश्चात्य उपचार पद्धती वृद्धिंगत झाली.

अमेरिकन मिशनरी डॉ. विल्येम वानलेस यांनी पाश्चात्य उपचार पद्धती सुरु केली.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर उपचार करणारी हॉस्पिटल्स सध्या मिरज येथे आहेत.

देशातील पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये पार पडली.


सांगली हळदीची मोठी बाजारपेठ :

देशातील सर्वांत मोठी हळदीची व्यापारी पेठ सांगली येथे आहे.

फॉरवर्ड मार्केट कमिशनच्या मान्यतेने मे, सप्टेंबर, डिसेंबर मध्ये हळदीचा वायदा ठरतो.

हळद साठवून ठेवण्याची खास ‘पेवे’ हरिपूरच्या परिसरात आढळतात.

अशा पेवांत सहा-सात लाख क्विंटल हळद साठवलेली असते.